संचालक (वित्त)
श्री अनुदीप दिघे यांची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) चे संचालक (वित्त) म्हणून महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे.
सुमारे २७ वर्षांचा सार्वजनिक वित्त प्रशासनातील समृद्ध अनुभव असलेले श्री. दिघे हे पुण्याचे मूळ रहिवासी असून एक अत्यंत कुशल आणि अनुभवी वित्त व्यावसायिक आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी आणि व्यवस्थापन शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. १९९८ मध्ये त्यांनी सहाय्यक संचालक म्हणून महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेमध्ये प्रवेश केला.
कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून त्यामध्ये स्थानिक निधी लेखा विभाग (नवी मुंबई), वेतन व लेखा कार्यालय (मुंबई कोषागार), तसेच उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महापालिकांमध्ये मुख्य वित्त अधिकारी (CFO) म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
२०१० मध्ये त्यांची उपसंचालकपदी पदोन्नती झाली. त्यानंतर त्यांनी २०१५–२०१६ या कालावधीत मुंबई येथील नगर प्रशासन संचालनालयात वित्त सल्लागार म्हणून, तसेच २०१७–२०१९ या कालावधीत वित्त विभागात विशेष कार्य अधिकारी (OSD) व उप सचिव म्हणून काम पाहिले.
२०१९ ते २०२१ दरम्यान त्यांनी ‘महानंद’चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार सांभाळला. त्याआधी ते दुग्ध विभाग, मुंबई येथे वित्तीय महाव्यवस्थापक आणि उप आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर २०२१ ते २०२३ या कालावधीत ते कोकण विभाग, वित्त विभाग, नवी मुंबई येथे संयुक्त संचालक (लेखा व कोषागार) म्हणून कार्यरत होते. २०२२ मध्ये त्यांना संचालकपदी पदोन्नती देण्यात आली.