कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आदेश

मुंबई, दि. २२ मार्च २०२० : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

२३ मार्चपासून मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये. या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्याची सूचना त्यांनी दिल्यात. या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नाही. तथापि महावितरणच्या वेबसाईटवर बिले उपलब्ध करून देण्यात यावी, असेही त्यांनी आदेश दिले आहेत. सोबतच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर बिलासंबंधीचे एस.एम.एस.संदेश पाठविण्यात येणार आहे.

या कालावधीत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे व ग्राहकांच्या विजेबाबतच्या तक्रारी ।स्वतःची योग्य काळजी घेऊन निवारण करावे, अशा सूचना डॉ. राऊत यांनी महावितरण प्रशासनाला दिल्या आहेत.

करोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रात मर्यादित मनुष्यबळ उपलब्ध आहे, त्यामुळे आपली तक्रार टोलफ्री नंबरवर नोंदविण्यासाठी विलंब लागू शकतो. आपण आपल्या वीजपुरवठ्याबाबतच्या तक्रारी महावितरण पोर्टल व मोबाइल अ‍ॅपद्वारे नोंदवाव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Urja
Empowering the Consumer